अभिनेता महेश बाबूला ईडीने बजावले समन्स   

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याला आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. त्यानुसार, त्याला २७ एप्रिल रोजी हैदराबाद येथील ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. यावेळी महेश बाबू याचा आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पीएमपीएल) जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.
 
साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या रिअल इस्टेट कंपन्यांशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहेत. महेश बाबू हे या कंपन्यांच्या ग्रीन मेडोज प्रकल्पाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. या प्रकरणात ईडीने १६ एप्रिल रोजी सिकंदराबाद, ज्युबिली हिल्स आणि बोवेनपल्ली परिसरात छापे घातले होते. 
 
साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपने सुरू केलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये महेश बाबूने काम केले होते. या जाहिरातींसाठी त्याला ५.९ कोटी मिळाल्याचे वृत्त आहे. यापैकी, ३.४ कोटी धनादेशाद्वारे आणि २.५ कोटी रोख स्वरूपात मिळाले होते. मात्र, त्याच्यावर अद्याप कोणतेही आरोप नाहीत. 
 

Related Articles